कोल्हापूर - ज्या बारामतीत राजू शेट्टी यांनी चळवळीचा इतिहास रचला, त्याच बारामतीत आमदारकीसाठी त्यांना शरण जावे लागले. शेट्टी यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला असून, सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेची त्यांनी चेष्टा केली असल्याची घणाघाती टीका जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली.
आजपर्यंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला घामाचा दाम मिळावा यासाठी गावागावात संघर्ष केला. अनेक ठिकाणी साखर सम्राटांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. खोटे गुन्हे दाखल केले. हे कार्यकर्ते आजही कोर्टात चकरा मारत आहेत. ज्या राष्ट्रवादी बरोबर आजपर्यंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला त्याच पक्षाच्या नेत्यांच्या दारात पदासाठी राजू शेट्टीं सारख्या माणसाला जावं लागणं ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची शोकांतिका असल्याची टीकाही माने यांनी केली. आमदारकी घ्यायची होती तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार करता आला असता. स्वाभिमानीकडे डॉ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक आदी शिलेदार होते. चळवळ वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता, परंतु केवळ सत्ता आणि सत्ता याच्याच मागे लागलेल्या शेट्टी यांना कार्यकर्त्यांचे कोणतेच सोयरसुतक नाही. यामुळेच त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा घात करून गोविंदबागेत आमदारकी स्वीकारली असल्याचे त्यांनी म्हटले.