कोल्हापूर - मागच्या आठवड्यात कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मानगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. आता या वादावर आता तेथील ग्रामस्थांनीच सांमजस्याने पडदा टाकला आहे.
मानगुत्ती, बुळशीनट्टी आणि बेडकोळी या तीनही गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन मानगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाल्मिकी ऋषी आणि श्रीकृष्ण यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नियोजित ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून भूमिपूजनही केले. लवकरच सर्वच महापुरुषांचे पुतळे इथे उभारले जाणार आहेत. ग्रामस्थांनीच स्वतःहून भूमिपूजनानंतर वाद मिटल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर पडदा पडला आहे.
काय आहे प्रकरण ?
कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला विरोध केला होता. यानंतर कर्नाटक प्रशासनानेसुद्धा त्यांचीच बाजू घेत शुक्रवारी रात्री रातोरात हा अश्वारूढ पुतळा हटवला. या घटनेनंतर दोन्ही कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण तयार झाले होते.