कोल्हापूर - महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश हवा असल्यास कर्नाटक सरकारने कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटककडून ही टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी संतापलेले शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले असून कर्नाटकने टेस्टचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कर्नाटकातून एकही वाहन महाराष्ट्रात येऊ न देण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. यावेळी कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या काही गाड्याडी शिवसैनिकांनी अडवल्या असून जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नसल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला.
नाक दाबल्याशीवाय कर्नाटक सरकार तोंड उघडणार नाही -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. दोन्ही राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरल्यानंतर केंद्र सरकारच्या नियमांनुसार वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र कर्नाटक मधून महाराष्ट्रात होणाऱ्या वाहतुकीला कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
आक्रमक शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात-
कर्नाटक सरकारच्या गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील नागरिकांना तसेच आजारा, गडहिंग्लज, चंदगड या कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिकांना सुद्धा या निर्णयामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या भागात जायचे असेल तर कर्नाटकच्या हद्दीतून जावे लागते. मात्र तरीही या गाड्या कर्नाटक सरकार कडून अडविण्यात येत आहेत. या सर्वांचे आधारकार्ड किंव्हा कोणताही पुरावा दाखवून त्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मात्र तरीही महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जायला कर्नाटक सरकार अडवत असल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक मधून येणारी काही वाहने अडवली. यावेळी दोन्ही राज्याच्या हद्दीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.