कोल्हापूर - लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील अनेक नागरिकांची वीज बिलं वाढून आली आहेत. त्यामुळे या वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज (बुधवार) शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर शहरातील वाय पी पोवारनगर येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता. यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
लॉकडाऊनच्या 3 महिन्याच्या काळात महावितरणकडून कोणत्याही प्रकारचे मिटर रिडींग घेतले गेले नाही. सरासरी मीटर रेडींगच्या अनुषंगाने त्यांनी महावितरणकडून ग्राहकांना संदेश पाठवून बिले दिली गेली होती. मात्र, आत्ता तीन महिन्यानंतर एकत्र मिटर रिडींग घेऊन पाठवलेली बिलं ग्राहकांना घाम फोडणारी आहेत. शिवाय अनेकांनी ऑनलाईन बिलेसुद्धा भरली आहेत. तरीही अनेकांची बिल वाढून आली आहेत.
नेहमी तीनशे-चारशे रुपये येणार महिन्याचे बिल सहाशे ते सातशे रुपयांच्या घरात गेले आहे. वाढीव बिलं आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरच्या वाय पी पवारनगर महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वाढीव बिलं जाळण्यात आली. शिवाय महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. यावेळी जयवंत पाटील, अमर चव्हाण, रविकिरण गवळी, तुषार डावाळे, भाऊ डावाळे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.