कोल्हापूर - आदिमाता आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सव काळात देशभरातून 20 लाखांहून अधिक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. महापुरासारख्या प्रलयानंतरही यंदाचा नवरात्रौत्सव मोठ्या जल्लोषात आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटनवृद्धी आणि भाविकांना सोयी-सुविधा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन यंदाच्या नवरात्रौत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर सज्ज; अंबाबाई मंदिर सजले
कोल्हापूरचे अंबाबाईचे मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीच्या शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे आणि सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती आणि मंदिराचे अगदी साधे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा, असे म्हटले जाते.
हेही वाचा - महाराष्ट्र बोलतोय : पाहा काय आहेत कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या समस्या
यंदा पर्यटनवृद्धी आणि भाविकांना सोयीसुविधा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवरात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून भवानी मंडप परिसरातही विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येते आहे. यातच नवरात्रीत ९ दिवस देवीची विविध रुपात आकर्षक पूजा बांधण्यात येते.
श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवातील पूजा
रविवार (दि.२९) : (घटस्थापना) श्री त्रिपुरा सुंदरी
सोमवार (दि.३०) : गंगाअष्टक
मंगळवार (दि.१) : आनंद लहरी
बुधवार (दि.२) : यामुनाष्टक
गुरूवार (दि.3) : गजारूढ अंबारीतील बैठी पूजा (ललितापंचमी)
शुक्रवार (दि.४) : शारदा
शनिवार (दि. ५) : कनकधारा
रविवार (दि ६) : महिषासूरमर्दिनी
सोमवार (दि. ७) : अन्नपूर्णा
मंगळवार (दि.८) : रथारूढ पूजा (विजयादशमी)
सुरक्षेच्या कारणात्सव अंबाबाई मंदिरात नवरात्र काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली आहे. मेटल डिटेक्टर दरवाजातून येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी केली जाणार असून मोठ्या बॅगसह प्रवेश देण्यात येत नाही. गेल्या वर्षीपासून नवरात्रकाळात अंबाबाई मंदिरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी स्वत:च्या कापडी पिशव्या आणाव्यात आणि दुकानदारांनी पिशव्या विक्री करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अंबाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. राज्यभरातून लाखो पर्यटक येथे देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. ते देखील देवीचं रूप पाहून समाधान व्यक्त करतात.