कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे, असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला आहे. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांनी उलट-सुलट बोलून मते घालवली आहेत. त्यामुळे त्यांना आता तोंड दाखवायला देखील जागा राहिली नाही. प्रकाश आंबेडकरांनीही वंचितांना सत्तेत आणायचे असल्यास एनडीएमध्ये यावे. प्रकाश आंबेडकर हे वंचितांना सत्तेपासून दूर ठेवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस देशात लवकर सत्तेत येईल असे वाटत नाही, त्यामुळे देशाच्या हितासाठी पवारांनी मोदींना साथ द्यावी, असे आठवले यावेळी म्हणाले. राम मंदिर अयोध्येतच व्हावे, असे माझे मत आहे. मात्र, त्यासाठी मुस्लीमांवर दबाव टाकता कामा नये. शिवाय ते मंदिर अधिकृत असावे, असे राम मंदिराच्या मुद्द्यावर आठवले म्हणाले.
छोट्या मित्र पक्षांना विधानसभेच्या २० जागा हव्या आहेत. त्यापैकी आठवले गटाला १२ जागा मिळाव्यात आणि सत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी आठवलेंनी केली.