कोल्हापूर - तिरुपतीवरून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे हा सोहळा देवस्थान समितीच्या कार्यालयात पार पडल्यानंतर अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला.
कोरोनामुळे एकीकडे अजूनही महाराष्ट्रातील मंदिर बंद आहेत. मात्र तिरुमल्ला देवस्थानने या वर्षीसुद्धा शालू पाठवून ही प्रथा कायम ठेवली आहे. यावेळी तिरूमला देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी आणि इतर मान्यवर तिरुपतीवरून कोल्हापुरात खास विमानाने हा शालू घेऊन आले. शालू घेऊन आलेल्या तिरूमला देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी आणि त्यांच्या पत्नी स्वर्णलता रेड्डी यांच्यासह तिरुमल्ला ट्रस्टच्या अध्यक्षांच्या पत्नी लक्ष्मी रेड्डी, गोपीनाथ जेड्डी, धर्मा रेड्डी, प्रशांती रेड्डी, अपर्णा रेड्डी यांचे पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे स्वागत करण्यात आले.
शिवाय, अंबाबाई देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन या सर्वांचा सन्मान सुद्धा यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासूनही प्रथा सुरू आहे. तिरुपतीवरून आंबाबाई देवीला आलेल्या या आहेराला मोठे महत्त्व आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात सुद्धा देवस्थानने ही प्रथा कायम ठेवली आहे. राखाडी रंग आणि गुलाबी काठ असलेला जवळपास 1 लाख 5 हजार 600 रुपये इतक्या मूल्याचा शालू अंबाबाईला अर्पण करण्यात आला.