मुंबई - शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. मात्र, छत्रपती राजर्षी शाहू हे भारतरत्न या किताबा पेक्षा मोठे आहेत. या पेक्षा कोणता मोठा पुरस्कार असेल तर त्यांना देण्यात यावा, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
शासकीय कामानिमित्त विधानभवनात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान द्यावा. यासंदर्भात केंद्र शासनाकडे राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर करावेत, अशी मागणी एन. डी. पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता.