कोल्हापूर - जिल्ह्यातील पुराला समोरे जाण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. धरणामधील पाण्याचे नियोजन करण्यासाठी धरण क्षेत्रातील सर्व अधिकारी आणि जिल्हाधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काही अडचण येणार नाही, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पुराचा आनंद घेताना नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या(एनडीआरएफ) चार टीम जिल्ह्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासन ज्या सूचना देईल त्याचे पालन करावे. सध्या कोरोनाचे संकट आहे त्यामुळे नागरिकांनी पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये. पाणी वाढत असताना नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना फोन करून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे का? पूरबाधित गावांमध्ये धान्य पोहचले आहे का? पोहोचले नसेल तर तातडीने पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकार्यांना केल्या आहेत.
मागील महापुराची सर्व नुकसान भरपाई दिली - पालकमंत्री
गेल्यावर्षी आलेल्या महापुराचा अनेक कुटुंबांना फटका बसला होता. अनेक घरांची पडझड झाली होती. याचा पंचनामा करून काही प्रमाणात पूर बधितांना मदत केली होती. गेल्या महिन्यात उर्वरित सर्वांना मदत देण्यात आली असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.