कोल्हापूर - दोन दिवसांपुर्वी कोल्हापुरातल्या कापशी परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये कधीच नाही इतकी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून होता तोंडाशी आलेली पिके जमीन दोस्त झाली आहेत. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.
नुकसानग्रस्त परिसरात जाऊन शेतकऱ्यांच्या प्लॉटची केली पाहणी -
समरजितसिंह घाटगे यांनी आज अर्जुनवाडा नंद्याळ, करड्याळ, मुगळी जैन्याळ येथील ऊस, कलिंगड, काकडी, वांगी, दोडका, भेंडी, कोबी अशा विविध नुकसानग्रस्त पिकांची पाहणी प्रत्यक्षात प्लॉटवर जाऊन केली. यावेळी त्यांच्यासोबत शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, शासकीय अधिकारी एस. बी. मगदूम, एस. बी. बुगडे, पी. ए. कांबळे, पी. एम. माळी, बी. आर. कुंभार आदी उपस्थित होते.
केलेला खर्च सोडाच; पीक काढणीसाठीही आता पदरचे पैसे खर्च करावे लागणार -
यावेळी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर समरजितसिंह घाटगे म्हणाले, या परिसरात गारपीटसह इतका मोठा पाऊस पहिल्यांदाच झाला आहे. त्यामुळे अनेक नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी यासाठी केलेला खर्च सोडाच नुकसान झालेले पीक काढण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. आधीच कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. शासनाने आता केवळ पंचनामे व कागदी घोडे नाचविण्यात फार वेळ न दवडता लवकरात लवकर त्यादृष्टीने कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा करून त्यांना दिलासा द्यावा असे म्हणत त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी त्यांनी आनंदा दाडमोडे, तानाजी दाडमोडे अर्जुनवडा, प्रदीप पाटील, रणजीत पाटील, प्रवीण जाधव दत्ता कोराने भीमा ढोले, सचिन चेचर, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्यासाठी प्रयत्न करेन असे सांगत त्यांना दिलासाही दिला.
शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न -
समरजितसिंह घाटगे म्हणाले, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील शाहू साखर कारखान्याकडे नोंद असलेल्या उसाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश बांधावरच त्यांनी शेती खात्यास दिले आहे. नुकसानग्रस्त ऊसकरी सभासदांसाठी कारखान्यामार्फत कशाप्रकारे मदत करता येईल याची माहिती घ्या कारखान्याच्या माध्यमातून निश्चितच नुकसानग्रस्त ऊस उत्पादक सभासदांना योग्य ती मदत करू असेही त्यांनी म्हंटले.