कोल्हापूर - संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक संघटना आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. यातच आता मराठा आरक्षणाबाबत ग्रामीण भागात सुद्धा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आजपासून सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील यड्राव गावामध्ये आज मराठा समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आता एकवटला पाहिजे ही भूमिका या बैठकीत त्यांनी मांडली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत शिरोळ, जयसिंगपूर, इचलकरंजी भागातील मराठा समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, घाटगे हे कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दौरा करणार आहेत.
'...तर त्याला रोखण्याचा अधिकार कोणाला नाही'
गेल्या वेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे 58 मोर्चे झाले त्यामुळेच सरकारला आरक्षण द्यावे लागले. आता पुन्हा तिच परिस्थिती झाली आहे. संपूर्ण गावागावात मराठा समाज एकवटत आहे. अनेकजण आक्रमक होत आहे. कोरोना असला तरी सर्वजण नियम पाळून आंदोलन करणार असतील किंव्हा रस्त्यावर उतरणार असतील तर त्याला रोखण्याचा अधिकार कोणाला नाहीये असेही समरजितसिंह घाटगे यांनी म्हंटले आहे.
'मागास आयोग स्थापन करा आणि त्यावर योग्य व्यक्तीला अध्यक्ष करा'
यावेळी पत्रकारांशी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, सर्वात पहिला सरकारने मागास आयोगाची स्थापना केली पाहिजे त्याचबरोबर त्यावर योग्य व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करा. आता जसा घोळ झाला आहे, तसाच घोळ पुन्हा झाल्यास किंव्हा आयोगच अमान्य झाल्यास पुन्हा वेळ जाईल. त्यामुळे याची खबरदारी घ्यावी. जर चुकीचा अध्यक्ष नेमला तर समाजाच्या अक्रोशालाही आपल्याला समोरे जावे लागेल असेही घाटगे यांनी म्हंटले आहे.
'मराठा आरक्षणासंदर्भात मुश्रीफ यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही'
निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच फडणवीस सरकारने आरक्षण दिले आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांत जे झाले नाही ते मागच्या वेळच्या सरकारने केले. आता कोणत्याही पद्धतीने आरोप करत बसण्यापेक्षा मराठा आरक्षणासंदर्भात पावले उचला. शिवाय मराठा आरक्षणासंदर्भात मुश्रीफ यांना उत्तर द्यायला मला कुठलीही बांधीलकी नाहीये असेही त्यांनी म्हंटले आहे.