कोल्हापूर - गेले अनेक वर्ष रखडलेल्या आंबेहोळ धरण प्रकल्पाला भाजपने मंजुरी देत 227 कोटीचा निधी दिला. हा निधी असून देखील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय का मार्गी लागत नाही. आलेला निधी गेला कुठे ? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला आहे. आंबेहोळ धरण प्रकल्पासंदर्भात आज घाटगे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
आजरा तालुक्यातील नागरिकांना पाण्याची सोय उपलब्ध होण्यासाठी 2002 साले आंबेहोळ धरत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मात्र, या रखडलेले काम भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पासाठी 227 कोटींचा मंजूर केला. धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या निधीतून केले जाणार होते. मात्र, अद्याप पुनर्वसन न झाल्याने आंबेहोळ धरण कामाला स्थानिक नागरिकांचा विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे सध्या पोलीस बंदोबस्तात धरणाचे काम सुरू आहे. त्यासंदर्भात आज भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेत यासंदर्भात चर्चा केली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
घाटगे पुढे म्हणाले, आंबेहोळ प्रकल्प हा शंभर टक्के पूर्ण झाला पाहिजे. 2002 पासून रखडलेल्या प्रकल्पाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी 227 कोटी निधी दिला. हा निधी असून सुद्धा पुनर्वसन विषय का सुटत नाही? असा सवाल घाटगे यांनी केला. लाभ क्षेत्रातील लोकांना पाणी मिळालेच पाहिजे. मात्र, पुनर्वसनाचा विषय किचकट होत चालला आहे. त्यामुळे धरणाच्या कामात अडचण येऊ नये, या हेतूने मी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
अनेक वर्ष लोक पाण्यासाठी थांबले आहेत. या प्रकल्पामुळे लोकांचे स्वप्न साकार होत आहे. मात्र, पुनर्वसनामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. या विषयावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, इतकाच उद्देश यामागे आहे. असे समरजित घाटगे म्हणाले. केवळ श्रेय वादासाठी या भानगडीत पडायचे नाही, माझा हेतू केवळ लोकांना पाणी मिळाले पाहिजे हाच आहे, असे देखील समरजित घाटगे म्हणाले.