कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाची स्थगिती उठेपर्यंत मेगा पोलीस भरती करू नये अशी भाजप जिल्हाध्यक्ष तसेच शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे घाटगे यांनी ही मागणी केली आहे.
समरजित घाटगे यांनी पत्रात म्हटले आहे, की महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यात मेगा भरतीअंतर्गत 12 हजार 528 पदे भरती करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षण मंजूर होऊन इतर समाजाप्रमाणे मराठा समाजातील तरूणांनाही नोकरीमध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून मराठा समाजातील तरुण ताकदीने विविध पदांच्या भरतीसाठी तयारी करीत आहेत. मराठा आरक्षण मंजुरीपूर्वी ही भरती झाल्यास अशा मराठा समाजातील तरुणांवर मोठा अन्याय होणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतरच या भरतीसह सर्वच नोकर भरती करावी. तरच पिढ्यानपिढ्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला न्याय मिळेल.
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीतही मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आरक्षण मंजुरीपूर्वी ही भरती केल्यास मराठा समाजामध्ये राज्यभर तीव्र असंतोष निर्माण होईल. कोणत्याही प्रकारचा सामाजिक उद्रेक होऊ नये. त्यासाठी न्यायालयात मराठा आरक्षण मंजूर होत नाही. तोपर्यंत पोलीस भरतीसह कोणत्या प्रकारची नोकर भरती करण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी घाटगे यांनी केली आहे.
हेही वाचा : 'आधी मराठा आरक्षण नंतर पोलीस भरती; अन्यथा परिणामांना सामोरे जा'