कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला 'संवेदनशील उत्पत्तीची ठिकाणे' म्हणून घोषित केले आहेत. या ठिकाणांहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आता कोरोना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिला आहे
राज्यात वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने महाराष्ट्राच्या सर्व सीमाभागात जाऊन आढावा घेतला. राज्याच्या सीमा भागात इतर राज्यातील प्रवाशांना प्रवास करताना कोणती उपाययोजना राबवली आहे? याबाबत ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आढावा घेतला. मात्र या आढाव्यात महाराष्ट्रात प्रवेश करत असताना प्रवाशांना कोणतीच तपासणी, आरटीपीसीआर अहवाल, शिवाय थर्मल स्कॅनिंग केले जात नव्हते. तसेच येणाऱ्या वाहनांची नोंद ठेवली जात नव्हती. त्याबाबत ईटीव्ही भारतने राज्याच्या सीमा भागातून वृत्त प्रसारित केले.
त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने देशातील पाच राज्यांना 'संवेदनशील उत्पत्तीची ठिकाणे' म्हणून घोषित केले. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड या राज्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे आता या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 48 तासाच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.