कोल्हापूर - संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. येथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा पार पडतो. दसरा चौक मैदानात मंडपासह शामियाना उभा केला जातो. सायंकाळी या ठिकाणी सोने लुटण्याचा म्हणजेच शमीपूजन कार्यक्रम पार पडतो. या सोहळ्याला भवानी मंडपातून लवाजम्यासह श्री भवानीची पालखी मंदिरातून बाहेर पडते. तर, श्री अंबाबाई, श्री गुरुमहाराज यांच्या पालख्याही परंपरेनुसार दसरा चौकात येतात.
हेही वाचा - विजयादशमी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झेंडूची आरास
विशेष म्हणजे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे, यशराजे यांचे न्यू पॅलेस येथून मेबॅक गाडीतून पारंपरिक लवाजम्यासह दसरा चौकात आगमन होते. त्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते शमीपूजन सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडतो. यावेळी सोने लुटण्यासाठी कोल्हापूरकरांची एकच झुंबड उडते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज सुद्धा उपस्थितांना सोने देऊन त्यांच्याकडून सुद्धा सोन्याचा स्वीकार करत दसऱ्याच्या शुभेच्छा देतात.
सोहळ्यानंतर परंपरेनुसार श्री अंबाबाईची पालखी पुन्हा मंदिराकडे जाते. अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून दसरा चौकामध्ये हा सोहळा पार पडत असतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा होणार नाही. जनतेने घरातूनच दसऱ्याचा आनंद घेण्याचे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले आहे. यापूर्वी जेव्हा प्लेग ची साथ आली होती, तेव्हा सुद्धा हा सोहळा रद्द करावा लागला होता. आता दुसऱ्यांदा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा - देशातील सर्व नागरिकांची 'हिंदू' हीच ओळख - सरसंघचालक