कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज ४३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर ( results of Gram Panchayat elections announced ) झाले. यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्याने या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती. यामध्ये अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोल्हापूर शहरालगत तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या ग्रामपंचायत मध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले तर काही अपेक्षित निकाल लागल्याने अनेकजण आनंदात आहेत. करवीर तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा व संवेदनशील असलेल्या पाचगाव, उचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, वडणगे, आदी ग्रामपंचायतींवर अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतपैकी एक अशी ओळख असलेल्या हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची ग्रामपंचायतमध्ये यंदा सत्तांतर झाले असून येथे महाडिक गटाचे उमेदवार ( Candidates of Mahadik group ) पद्मजा कृष्णात करपे विजयी (Padmaja Krishna Karpe won ) झाल्या आहेत. तर सतेज पाटील यांच्या गटाने सुद्धा अनेक महत्वाच्या गावात सरपंच पदासह सत्ता मिळवली आहे.
पक्षीय बलाबल :
एकूण ग्रामपंचायत - ४७५ | एकूण निकाल - ४७४ | ग्रामपंचायत बहिष्कार - ०१ |
शिवसेना ठाकरे | ६४ |
शिंदे गट | ६१ |
भाजप | ९८ |
राष्ट्रवादी | ९९ |
काँग्रेस | ६३ |
इतर | ८९ |
'वडणगे' गावात यांची सत्ता : करवीर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या असलेल्या वडणगे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दत्त आसुर्ले सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव रघुनाथ पाटील मास्तर गटाने सत्ता मिळवती. या गटाने चौदा जागा जिंकल्या. तर विरोधी पक्षाला तीन जागा मिळाल्या. सरपंच पदाच्या निवडणुकीत सदाशिव मास्तर पॅनेलच्या संगीता शहाजी पाटील ४६२ मतांनी विजयी झाल्या. वडणगे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद माजी सदस्य बी. एच. पाटील विरुद्ध सदाशिव रघुनाथ पाटील मास्तर पॅनेलमध्ये निवडणूक झाली. सरपंच पदाच्या निवडणुकीत मास्तर गटाच्या संगीता शहाजी पाटील यांनी वृषाली रवींद्र पाटील यांचा ४६२ मतांनी पराभव केला. पराभूत उमेदवार वृषाली पाटील या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी.एच. पाटील यांच्या सून आहेत. बी.एच. पाटील गटाच्या पराभवाने आमदार पी. एन. पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. मास्तर पॅनलने 14 जागा जिंकून सत्ताधारी बनण्याचा कौल मिळवला आहे. बी एच पाटील गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
सर्वात मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक : जिल्ह्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची ग्रामपंचायतमध्ये यंदा सत्तांतर झाले. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महाडिक आघाडीची सरशी झाली. महाडिक गटाचे उमेदवार पद्मजा कृष्णात करपे विजयी झाल्या. सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी आणि विरोधी महाडिक आघाडी यांच्यामध्ये थेट लढत झाली. सत्ताधारी आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार माजी ग्रामपंचायत सदस्य रुपाली खवरे यांचा पराभव झाला. आमदार सतेज पाटील गटासाठी हा धक्का आहे. ग्रामपंचायतमध्ये यंदा बदल घडवायचा या इराद्याने महाडिक गटाने निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवली.
महाडिक गटाने प्रचारात आघाडी घेतली : माजी आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी निवडणुकीत लक्ष घातले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी निवडणुकीपूर्वी शिरोलीत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. महाडिक आघाडीकडून सरपंचपदासाठी चौघी इच्छुक होत्या. यामध्ये माजी उपसरपंच कृष्णात करपे यांच्या पत्नी पद्मजा यांना उमेदवारी मिळाली. सरपंच पदाची उमेदवारी निश्चित झाल्यापासून महाडिक गटाने प्रचारात आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. सरपंच शशिकांत खवरे यांच्या कामकाजाविषयी विरोधकांनी आक्षेप नोंदवले होते. ग्रामपंचायतीच्या एकूण १७ जागेसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. पहिल्या फेरीपासूनच महाडिक गटाने आघाडी घेतली होती. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १६ जागा महाडिक गटाने जिंकल्या. सरपंच पदाच्या निवडीतही चार हजाराहून अधिक मताधिक्याने पद्मजा करपे विजयी झाल्या.
शंभूराज देसाई यांनी प्रचार केलेल्या गावात शिंदे गट पराभूत : चंदगड तालुक्यातील शिनोळी मध्ये शिंदे गटाचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवून लावली. एकूण 9 पैकी 7 जागा जिंकत राजेश पाटील आणि भरमु सुबराव यांनी गावातील सत्तेला हादरा दिला. विशेष म्हणजे शिणोळी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रचार केला होता. शंभूराज देसाई निवडणुकीत प्रचार केल्याने सर्वांच्या नजरा या निवडणुक निकालाकडे लागल्या होत्या. मात्र याठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
चित्रा वाघ यांनी प्रचार केलेल्या गावातील भाजप उमेदवाराचा पराभव : दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोल्हापूर शहरालगत असलेल्या उचगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार केला होता. मात्र यामध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. याठिकाणी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार मधुकर चव्हाण यांनी बाजी मारली आहे. एकूण तीन वेळा फेर मतमोजणी नंतर हे उमेदवार निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. अगदी कमी मतांच्या फरकाने निवडून आल्याने स्वतः विजयी उमेदवाराने फेर मतमोजणी साठी विनंती केली होती. त्यानंतर पुन्हा भाजपच्या पराभूत उमेदवाराने फेर मतमोजणी साठी मागणी केली. त्यानंतर विजयी उमेदवार जाहीर करण्यात आला.