कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांचे सर्व लक्ष गोकुळच्या मलईकडे होते. म्हणूनच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती रोखण्यास ते अपयशी ठरले आहेत. अशी टीका शिवसेनेचे शहराध्यक्ष रवीकिरण इंगवले यांनी केली. ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरची कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थीतीला पालकमंत्री जबाबदार - इंगवले
जिल्ह्यात मागील 24 तासात जवळपास अडीच हजार कोरोना बाधितांची नव्याने नोंद झाली आहे. सरासरी पाहिल्यास मुंबईसारख्या शहराची रोज बाधितांची संख्या वीस हजारपेक्षा अधिक असायला हवी, मात्र मुंबईची परिस्थिती आटोक्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थीती गंभीर होत चालली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री सतेज पाटील आहेत, असा आरोप इंगवले यांनी केला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी इतर संस्थांच्या इमारती महापालिकेवर दबाव टाकून क्वाराटाईन सेंटर सुरू करण्यासाठी ताब्यात घेतल्या आहेत, अशा सोळा इमारती आहेत. मात्र स्वतःचे कोणतेच कॉलेज, संस्था कोरोना सेंटरसाठी उपलब्ध करून दिल्या नाही. पालकमंत्र्यांनी याचा अर्थ सांगावा. याबद्दल दुजाभाव का केला? 'दुसऱ्याच्या संस्था ताब्यात घेता व तुमच्या रिकाम्या का ठेवता?' असा सवाल देखील त्यांनी केला.
कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घालावे लक्ष - इंगवले
कोरोना संभाव्य तिसर्या लाटेत माझ्याकडून कोरोना सेंटर सुरू केले जाईल. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही सर्व परिस्थिती गोकुळच्या निवडणुकीमुळे निर्माण झाली आहे. पालकमंत्री जिल्ह्यात कोरोना रोखण्यास अपयशी ठरले आहेत. त्यांचे सर्व लक्ष गोकुळच्या मलईकडे होते. त्यामुळेच जिल्ह्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी इंगवले यांनी केली.