कोल्हापूर - शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालेली नाही. तसेच कृषिपंपाचे थकित वीज बिल शेतकरी भरू शकत नाहीत. त्यामुळे कर्जमाफी तसेत वाढीव बिल रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा- लंडन ब्रिज हल्ला : हल्लेखोर पोलिसांकडून ठार; चाकू हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू
आघाडी स्थापन होण्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. शिवाय राज्यातील शेतकरी महापूर, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देऊन त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने संपूर्ण कर्जमाफी आणि कृषिपंपाचे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.