कोल्हापूर - सुधारीत शेतकरी विधेकाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील घरी विधेयकाची होळी करत निषेध नोंदवला. स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण होते ते चोरपावलांनी काढून घ्यायचे आणि मोठ्या कार्पोरेट कंपन्यांच्या हातात द्यायचे. शिवाय नाफेड आणि एफसीआय सारख्या कंपन्यांची गोडावून आपल्या घशात घालायची, हाच या मागचा डाव असल्याची प्रतिक्रिया सुद्धा शेट्टींनी यावेळी व्यक्त केली.
आज संपूर्ण देशातील २६० विविध शेतकरी संघटना, डावी आघाडी, कामगार संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक राजू शेट्टी यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारने राज्यसभेत तीन शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली आहे. त्याचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होणार नसल्याचे अनेक संघटनांनी जाहीर केले आहे. सरकार हमीभावातून शेतकऱ्यांना बाजूला सारत आहेत. या शेतकरी धोरणाविरोधात देशभरातील शेतकरी संघटनामध्ये तीव्र अंसतोष पसरलेला आहे.
या आंदोलनाची सुरुवात म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विधेयकाची होळी करण्यात आली. शिरोळ येथे राहत्या घराबाहेर राजू शेट्टी यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारी विधेयके आहेत. खरंतर स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांना हमीभावाचं संरक्षण होतं ते चोरपावलांनी काढुन घ्यायचं आणि मोठ्या कार्पोरेट कंपन्यांच्या हातात द्यायचे हाच यामागचा डाव आहे. भारतात एकूण जितके अन्न धान्य उत्पादन होते, त्यातील 30 टक्के अन्न धान्य भारत सरकार नाफेड, एफसीआय आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करते. खरंतर कायदा हमीभावाने खरेदी करावे अस नाही आहे, पण नैतिकता म्हणून केंद्र सरकारच्या या कंपन्या हमीभावाच्या आसपासच्या किंमतीमध्ये माल खरेदी करतात. एअर इंडिया चे ज्या पद्धतीने खाजगीकरण झाले आणि बीएसएनएल ज्या पद्धतीने खाजगीकरणाच्या मार्गावर आहेत. त्याच मार्गाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगम (एफसीआय) यांचे सुद्धा भविष्यात खासगीकरण होणार असल्याची भीती सुद्धा शेट्टींनी यावेळी व्यक्त केली.
देशभरात हजारो ठिकाणी एफसीआयची गोडावून आहेत. ही सर्व गोडावून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. अब्जावधी किमतीचे ही सर्व गोडाऊन आपल्या घशाला घालायचा हा डाव आहे. ही लूट झाल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांनी आपला माल केवळ यांनाच विकायचा आणि ग्राहकांनी सुद्धा त्यांच्याकडूनच विकत घ्यायचा. शिवाय ते सांगतील तशी आम्ही शेती करायची असाच हा संपूर्ण डाव सुरू असून त्याला आम्ही विरोध करत असल्याचेही राजू शेट्टींनी म्हटले. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विधेयकाची होळी करण्यात आहे.