कोल्हापूर - धरण क्षेत्रात पडत असलेला मोठा पाऊस, पंचगंगा नदीचे पात्रा बाहेर गेलेले पाणी, त्याचबरोबर अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका ओळखून प्रशासनाला सतर्कतेचे आदेश शासनाने दिले आहेत. खबरदारी म्हणून कोल्हापूर शहर व शिरोळ तालुक्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूर व शिरोळ येथे दाखल झालेल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
'जलसंपदा मंत्र्यासोबत पूर परिस्थितीबाबत चर्चा'
आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, की मागील दोन दिवसांमध्ये कोयना, चांदोली तसेच राधानगरी व काळम्मावाडी या धरण क्षेत्रांमध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाटबंधारे विभागाचे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव विजय गौतम, पाटबंधारे विभागाच्या पुणे विभागाचे अभियंता गुणाले तसेच कर्नाटक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आपण चर्चा केली असल्याचे यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यामध्ये जून 2019मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीमध्ये धरणांमधील पाणीसाठ्या बाबतचे नियोजन दोन्ही राज्यांनी निश्चित केले असून या नियोजनामुळे पूरस्थिती ओढवणार नाही याची काळजी घेतली जाईल, याबाबतच्या सूचना कर्नाटक व महाराष्ट्र राज्याचा पाटबंधारे विभागाला दिल्या असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे.
'कृष्णा काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे'
ते पुढे म्हणाले, की सध्या आलमट्टी धरणामधून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने गुरुवारपासून कोयना धरणातून 11000 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी केले आहे.