म्युनिच - जर्मनी येथे सुरू असलेल्या आंतराष्ट्रीय नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक कमावले आहे. सोमवारी झालेल्या २५ मीटर पिस्टल प्रकारात राहीने प्रथम क्रमांक पटकावत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही मिळवले आहे.
२५ मीटर पिस्टल प्रकारात युक्रेनच्या ओलेना कोस्टेविचने रौप्यपदक तर, बुल्गेरियाच्या अॅन्टोनेटा बोनेवाने कांस्यपदकाची कमाई केली. सोमवारी सकाळच्या सत्रात १० मीटर एअर पिस्टल प्रकारात स्वत:चाच २४५ गुणांचा विक्रम मोडित काढत सौरभ चौधरीने २४६.३ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. यासह सौरभने टोकियो ऑलिंपिकसाठी तिकिट पक्के केले आहे. रविवारी सुरू झालेल्या स्पर्धेत अपूर्वी चंदेलाने भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले होते. ३ सुवर्ण पदकांसह भारत गुणतालिकेत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.