कोल्हापूर - खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुरुवार (दि. 4 ऑगस्ट )रोजी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ( Gokul Milk Union Kolhapur ) खासदार धनंजय महाडिक यांची खाजगीत भेट झाली तर मी त्यांना समजावून सांगेल. या दोन्हीही संस्थांची आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभार, याबाबत त्यांना समजावून सांगेन. त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत, असा विश्वासही आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गोकुळ आणि जिल्हा बँकेत सतीश पाटीलच नाहीतर हसन मुश्रीफ सुद्धा घटक - आमदार मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाची सत्ता याबाबत केलेला दावा मी प्रसारमाध्यमांमध्ये वाचला आणि बघितला. खासदार धनंजय महाडिक यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. मात्र, या दोन्हीही संस्थांच्या सत्तांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील. केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नाही. कारण वरती जरी सत्ता बदल झाला असला तरी ही सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातील आहेत. परखी माणसं नाहीत. निवडून आलेले जे संचालक आहेत. त्यांच्यासाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नाही असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
14 दिवसाच्या कारखाने एफ आर पी कसे देणार - एफआरपी वाढवण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला याबद्दल आनंद आहे. मात्र, एका बाजूला साखरेचे दर कमी होत असताना ते 3300 ते 3500 रुपये साखर व्हावी यासाठी केलेली फाईल ही केंद्र सरकारकडे पडून असताना 14 दिवसाच्या आत कारखाने एफआरपी कशी देणार असा सवाल मुश्रीफ यांनी यावेळी विचारला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात तब्बल 300 ते 400 रुपये प्रती टन एफ आर पी वाढली. जोपर्यंत 3300 ते 3500 साखर होणार नाही तोपर्यंत एफ आर पी देता येणार नाही.
कारखान्यांना हा बोजा उचलावा लागत आहे - सर्व कारखाने व बँकांची माहिती घेतली तर अनेक कारखान्यांचा कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना प्रबळ असल्याने चार कारखान्याची कोंडी होते आणि यामुळेच बाकीच्या कारखान्यांनाही एक रकमी एफआरपी द्यावी लागते. साखर दीड ते दोन वर्ष कारखान्यामध्ये पडून असती. मग पैसे कुठून देणार आणि व्याजाने तरी पैसे काढून किती देणार असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. तसेच, आजूबाजूच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये एक रकमी एफ आर पी दिलीजात नाही. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना हा बोजा उचलावा लागत आहे. हे आम्ही शेतकरी संघटनेच्या लोकांना अनेक वेळा समजावून सांगितले. तसेच, यामुळे शेतकऱ्याचे देखील नुकसान होत आहे हे त्यांना सांगितले असल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.