कोल्हापूर - पूरग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यात याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या २८ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. शिवाय कोल्हापूर आणि सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात यावी, यासह अनेक मागण्याही या मोर्चामध्ये करण्यात येणार आहेत. येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
कर्नाटक व महाराष्ट्रातील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करण्याची गरज आहे. कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या महापुरात राष्ट्रीय आपत्ती घोषित करून राष्ट्रीय आपदा कोशातून पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद या क्षेत्रासाठी करण्यात यावी. तसेच पूरग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची गरज आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि वीजबिल, पाणीपट्टी, उपसा कर यामध्ये सुद्धा माफी देण्यात यावी, असेही शेट्टी म्हणाले.
त्याचबरोबर महापुरामुळे बुडालेल्या कृषी पंप सेट, मीटर नुकसान भरपाई व मीटर बदलून देणे, ठिबक सिंचन, शेडनेट ग्रीनहाऊस, गोठा, पोल्ट्री, गुऱ्हाळघर यांची नुकसान भरपाई सुद्धा द्यावी आणि तातडीने कृषी वीज पंपांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मृत गाई-म्हशींना, प्रति जनावरांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी. तसेच शंभर टक्के पूरग्रस्त पशुपालकांना ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यायची गरज आहे. त्यासाठी मृत शेळी, मेंढी आणि वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी प्रमुख मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच छोटे लघु उद्योग, किरकोळ व्यापारी, फेरीवाले, टपरीधारक, यंत्रमागधारक, कुंभार, मूर्तिकार, सुतार, चर्मकार यांच्या उद्योग उभारणीसाठी भरीव मदत सुद्धा करण्यात यावी, यासारख्या मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.