कोल्हापूर - कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात आला आहे. महिला व बालकल्याण संरक्षण समिती आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी विवाहस्थळी धाव घेत हा विवाह रोखला. शिवाय मुलीला बालकल्याण समिती समोर हजर केले असून तिला बालगृहात ठेवण्यात आले आहे. तर या बेकायदेशीर विवाहाविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर येथील 24 वर्षीय तरुणाचा कोल्हापूरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुलीशी विवाह ठरला होता. सकाळी हा विवाह सोहळा लक्षतीर्थ वसाहत येथील स्वामी समर्थ मंदिरमध्ये होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षासह, महिला बाल कल्याण समितीला मिळाली. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्यासह पोलिसांनी विवाहस्थळी धाव घेत, हा विवाह सोहळा रोखला.
नवरा मुलासह त्याचे आई, वडिल आणि मुलीच्या आई विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अशा पद्धतीने कुठेही बालविवाह होत असल्यास याबाबत माहिती द्या, असे आवाहन महिला व बालकल्याण संरक्षण समितीकडून करण्यात आले आहे.
यांच्या विरोधात गुन्हा दाखल -
- राहुल राजुनाथ गोसावी, नवरा मुलगा
- राजूनाथ अशोक गोसावी, मुलाचे वडिल
- मनिषा राजुनाथ गोसावी, मुलाची आई
- रेखा संदीप गोसावी, मुलीची आई
हेही वाचा - विशेष : '..त्यामुळे आता कुंभार बांधवांमध्ये काहीच सहन करण्याची ताकद नाहीये'
हेही वाचा - धक्कादायक : वृद्ध पतीला पेटवून महिलेची आत्महत्या, शुश्रूषेला कंटाळून उचललं पाऊल