कोल्हापूर - पंधरा दिवसानंतरही कर्नाटकमधील मनगुत्ती गावात अद्याप छत्रपती शिवाजी महाराज यांचा काढलेला पुतळा पुन्हा बसवलेला नाही. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक थेट मनगुत्ती गावात जाऊन त्या ठिकाणी दांडी यात्रा काढणार आहेत. या दांडीमार्चच्या पार्श्वभूमीवर मनगुत्ती गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्वरित बसवावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली होती. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी मनगुत्ती गावाच्या प्रवेशद्वारावरच सकाळपासून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मनगुत्ती गावात जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करून त्यांना गावात सोडले जात आहे. शिवाय महाराष्ट्र पासिंगची वाहनेसुद्धा पोलीस अडवत आहेत.
शिवसेना कवळेकट्टी ते मनगुत्ती दांडी मार्च काढणार असल्याने कवळेकट्टी येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावातील व्यक्ती सोडून अन्य व्यक्तींना गावात जाण्यास परवानगी दिली नाही. दरम्यान मनगुत्ती, बुळशीनट्टी आणि बेडकोळी या तीनही गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन मनगुत्ती गावाच्या प्रवेशद्वाराशेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाल्मिकी ऋषी व श्रीकृष्ण यांचे पुतळे उभारण्याचा 15 दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता. नियोजित ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून भूमीपूजनही केले होते. लवकरच सर्वच महापुरुषांचे पुतळे इथे उभारले जाणार असेही गावकऱ्यांनी सांगितले होते. मात्र अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.