कोल्हापूर- शहरात पहिल्या दिवशी संचारबंदीचा फज्जा उडाल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केवळ अत्यावश्यक व परवानगी असणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येत आहे. शहरातील जवळपास ३० ठिकाणी ही कारवाई सुरू आहे.
कोल्हापूरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी फज्जाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुरुवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आला. कोल्हापूरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचारबंदीच्या पहिल्या दिवशी फज्जा उडाला होता. अत्यावश्यक व परवानगी असणारी दुकाने सोडली तर इतर दुकानाचे शटर डाऊन होते. मात्र, असे असताना देखील नागरिक रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत असल्याचे चित्र होते. पहिल्या दिवशी नागरिकांनी संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद दिला. नागरिकांच्या वाढत्या उपस्थितीमुळे कोरोनाची साखळी कशी तोडणार? असा सवाल उपस्थित झाला होता. तसेच पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनावरही टीकेची झोड उठली होती. त्यामुळे संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासन कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे. शहरातील सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, ताराराणी चौक, कळंबा, रंकाळा टॉवर, शिवाजी पूल, संभाजीनगर, सायबर चौक, तावडे हॉटेल, कसबा बावडा, धैर्यप्रसाद चौक यासह एकूण ३० ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली.
वाहनधारकांची कसून चौकशीशहरात अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र होते. अशा वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याचा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिल्या आहे. त्यानुसार प्रत्येक चौकात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. शिवाय त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी करत, परवानगी असेल तरच शहरात प्रवेश दिला जात आहे.