कोल्हापूर- देशभरातील सर्वच टोल नाक्यावर फास्टटॅग बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळारी कोल्हापूर जिल्ह्यातील किणी व महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ कमी प्रमाणात पाहायला मिळाली. तसेच ज्यांच्याकडे फास्ट टॅग नव्हता, अशा वाहनधारकांकडून दुप्पट टोल आकारण्यात आल्याचेही यावेळी समोर आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वादाचे प्रकार होऊ नयेत म्हणून टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मंगळवारी दिवसभर किणी आणि कोगनोळी या दोन्ही टोलनाक्यावर दोन वेगवेगळी चित्रे पाहायला मिळाली. ज्या वाहनांवर फास्टटॅग होते, अशा ठिकाणी वाहनांची गर्दी कमी पाहायला मिळाली. तर ज्या वाहनांवर फास्ट टॅग नव्हते, अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा-
1 जानेवारी नंतर देशभरात फास्टटॅग सर्व वाहनांना बंधनकारक करण्यात आला. मात्र त्याची कडक अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यानंतर मंगळवारपासून फास्टट्रॅक नसेल अशा वाहनधारकाकडून दुप्पट टोल आकारण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
वादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त
फास्टटॅग बंधनकारक केल्यानंतरही अनेक वाहनधारक टोलनाक्यावर येण्याची शक्यता प्रशासनाकडून ग्राह्य धरण्यात आलीच होती. त्यावेळी अशा वाहनधारकांकडून दुप्पट टोल आकारणीवेळी वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील किनी टोल नाक्यावर तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.