कोल्हापूर - कागल तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील राष्ट्रीयकृत बँकेवर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी पकडले. ही सराईत टोळी कर्नाटकच्या बेळगावमधील आहे. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. मात्र, या कारवाईदरम्यान, एक दरोडेखोर पळाला.
जिफान शाहबुद्दीन अन्निवाले, मंजुनाथ बसवराज पाटील, रफिक खतालसाब पठाण आणि यासीन उस्मान धारवाडकर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पलायन केलेल्या संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूरू महामार्गावर कागलजवळ उड्डाणपुलावर थांबलेल्या कारमधील तरुणांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास आली. तेव्हा तेथील नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून मोटारीसह ४ जणांना ताब्यात घेतले. मात्र, झटापटीत एक दरोडेखोर पसार झाला.
कारमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, घरगुती वापराची गॅस सिलिंडर टाकी, गॅसगन, दोन लोखंडी कटावण्या, कटर, लायटर, हेल्मेट, बॅटरी, माकड टोपी, हातमोजे, जर्किन, ३५ लिटरचे रिकामे कॅन, मोटारीच्या नंबर प्लेट, मोबाईल हँडसेट असा सुमारे २ लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
या टोळीने महिन्यापूर्वी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडमुडशिंगी येथील राष्ट्रीयकृत बँकेसह कागल येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची रेकी केली होती. या २ बँकांवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात ही टोळी होती, अशीही माहिती चौकशीतून निष्पन्न झाली असल्याचेही तानाजी सावंत यांनी सांगितले.