कोल्हापूर - शहरातील रामानंदनगर आणि बालाजी पार्कमध्ये ताप, अंगदुखीसोबतच हात, पाय सुजणे अशी लक्षणे असणारे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. चिकुनगुन्या आजाराप्रमाणे ही लक्षणे असली तरी रक्त तपासणीनंतर अहवाल मात्र, निगेटिव्ह येत आहे. हा एक प्रकारचा विषाणू संसर्ग असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. प्रत्येक घरात अशी लक्षणे असलेले रूग्ण आढळून येत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील किमान शंभरपेक्षा अधिक रुग्णांना या अज्ञात विषाणूचा संसर्ग झाला आहे. पुण्यातील प्रयोगशाळेतून रक्ततपासणी करून घेतल्याशिवाय या आजाराचे निदान होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शहरातील रामानंदनगर आणि बालाजी पार्क शेजारून नाला वाहतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. गेल्या महिन्यापासून बालाजी पार्कमध्ये ताप, प्रचंड अंगदुखी, हातपाय, तोंड सुजण्याचे रूग्ण आढळून येत आहेत. रुग्णाला बसल्या जागेवरून उठता येत नाही. या रुग्णांनी चिकुनगुन्या, टायफॉईड, डेंग्यू या आजारांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे नेमका आजार काय आहे? असा प्रश्न नागरिकांना आणि डॉक्टरांना पडला आहे. शाहू कॉलनीमध्ये देखील दोन महिन्यांपूर्वी अशीच लक्षणे असणारे रूग्ण सापडले होते.
महानगरपालिकेतर्फे या भागात रोज औषध फवारणी केली जात आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र हा कोणता आजार आहे याचे निदान लवकर लावावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. महानगरपालिकेकडून उपाययोजना राबवल्या जात असून नागरिकांनीही याबाबत दक्षता घ्यावी. खासगी वैद्यकीय व्यवस्थेने या संदर्भात वेळच्यावेळी प्रशासनाला माहिती द्यावी. अशा सूचना मनपाचे आरोग्यअधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.