कोल्हापूर - जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेल्या महसूल जत्रेअंतर्गत सामोपचाराने व लोकसहभागातून शेत रस्ते अतिक्रमण मुक्त होत आहेत. बुधवारी एकाच दिवशी भुदरगड तालुक्यातील 53 गावातील 62 तर आजरा तालुक्यामधील 52 गावातील 67 किमी लांबीचे रस्ते खुले करण्यास सुरूवात झाली. जिल्हाधिकारी देसाई यांनी जेसीबी चालकास सूचना देत भुदरगड तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील कामत पाणंद 2.5 किमी रस्ता खुला करण्याचा आज शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी जेसीबी चालवण्याचे तंत्र जाणून घेतले. दरम्यान, या महसूल जत्रेअंतर्गत भुदरगड तालुक्यातील 3 हजार 344 शेतकऱ्यांना तसेच आजरा तालुक्यातील 2 हजार 715 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
सामोपचाराने आणि लोक सहभागाने वाट मोकळी करू -
गाव शिवारातील प्रलंबित आणि जिव्हाळ्यांच्या प्रश्नांना सामोपचाराने आणि लोक सहभागाने वाट मोकळी करून देण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्ह्यात महसूल जत्रेचे आयोजन केले आहे. या महसूल जत्रेअंतर्गत पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त होण्यास सुरुवात झाली आहे. भुदरगड तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील कामत पाणंद रस्ता खुला करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जेसीबी चालकास स्वतः सूचना देत याचा शुभारंभ केला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार अश्विनी वरुटे, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर, सरपंच विश्वनाथ कुंभार, उपसरपंच उदय मिसाळ, पंचायत समिती माजी सभापती स्नेहल परीट, मंडळ अधिकारी रामदास लांब, तलाठी दयानंद कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाचे संकट मानवनिर्मित..मूठभरांना श्रीमंत करण्यासाठी जनतेला मूर्ख बनवले, पटोलेंची मल्लिनाथी
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि विशेष म्हणजे या कामात सर्वांनी सहकार्य करावे म्हणत ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी मानले.