कोल्हापूर - सध्या राज्यात कोरोनारुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासारखेच इतर प्रकल्प राज्यभर उभे करण्याचा विचार शासन करत आहे. काय आहे नेमका गडहिंग्लजचा ऑक्सिजन पॅटर्न यावरचा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट..
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले. तर अनेकांचा मृत्यूही झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील गडडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा अशीच परिस्थिती होती. या रुग्णालयात लागणारा ऑक्सिजन कोल्हापुरातून म्हणजे जवळपास 70 किलोमीटर वरून आणावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गडहिंग्लजमधल्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्याचे नियोजन केले. यासाठी तब्बल 80 लाखांचा खर्च झाला आणि जानेवारीमध्ये हा प्लांट कार्यान्वित झाला. सध्या या उप जिल्हा रुग्णालयातील 60 बेडपर्यंत एका लाईनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. गरजेनुसार त्याचा वापर सुरू आहे.
दररोज 150 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती क्षमता...
80 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्लान्टमध्ये दररोज 150 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती करू शकेल एवढी क्षमता आहे. त्यामुळे या प्लांटमधील ऑक्सिजन सुमारे शंभर रुग्णांना उपयोगी ठरत आहे. या ऑक्सिजन निर्मितीसाठी वीज बिल आणि इतर तांत्रिक देखभालीशिवाय कोणताही इतर खर्च येत नाही. त्यामुळे एकीकडे ऑक्सिजन मिळाला नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यूच्या दुर्दैवी घटना समोर येत असतानाच या उप जिल्हा रुग्णालयाने मात्र, ऑक्सिजनची निर्मिती आपल्या रुग्णालयातच केल्याने एक आदर्श मॉडेल ठरत आहे. त्यामुळे गडहिंग्लजसाठी हा प्रकल्प आधार ठरला आहेच. शिवाय, याच पद्धतीचे प्लांट आता राज्यातल्या प्रत्येक मोठ्या रुग्णालयाने उभे करणे गरजेचे आहे.