कोल्हापूर- इचलकरंजी शहरासाठी सुळकुडच्या दूधगंगा नदीपात्रातून पाणी उचलण्याला आता विरोध होत आहे. ही योजना दुधगंगा धरणातून शिल्लक राहिलेल्या अर्धा टीएमसी पाण्यावर केली जाणार आहे, असा इचलकरंजी वासीयांचा दावा आहे. मात्र, भविष्यात पाणी टंचाई जाणवेल, या धास्तीने कागल तालुक्यातील ३९ आणि शिरोळ तालुक्यातील १२ गावाने या योजनेला विरोध केला आहे. तर लाभ क्षेत्रातील जवळपास ५० गावे अस्वस्थ असून, कोणत्याही क्षणी आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दुधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने तत्त्वता मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार, कागल तालुक्यातील सुळकुड येथे बंधारा बांधण्यात येणार आहे. मात्र या योजनेचा फटका कागल आणि करवीर तालुक्यासह चार तालुक्यांना बसणार आहे. गावकऱ्यांमध्ये या योजनेविरोधात संताप आहे.
1991 साली स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी याच संदर्भात आंदोलन केले होते. आता समरजित घाटगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या योजनेत बदल अहवाल सरकारला पाठवण्याचे आवाहन केले आहे. जर यात बदल झाला नाही तर कोरोनासारख्या संकटात गावकऱ्यांकडून आंदोलन उभा होईल, असा इशाराही भाजप जिल्ह्याध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला आहे. त्यामुळे वेळीच यावर लक्ष घालून चार तालुक्यातील गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे.