कोल्हापूर - करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची आज पहिल्याच दिवशी महाशक्ती कुण्डलिनी स्वरुपात पूजा बांधण्यात आली. दरवर्षी संपूर्ण देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि नवरात्रोत्सव काळातील विविध रुपातील पूजा पाहण्यासाठी येथे येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश नाही. त्यामुळे, अंबाबाईच्या सर्वच भक्तांना ऑनलाइन माध्यमातूनच देवीचे हे देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवावे लागणार आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी नवरात्रोत्सव काळात करवीरनिवासिनीचे करवीर महात्म्यातील स्तोत्रांमध्ये होणारे दर्शन ही संकल्पना राबवण्यात आली आहे. सर्वत्र स्तोत्रांमधून करवीरनिवासिनीचे व्यापक आणि आदिशक्तीचे स्वरूपच वारंवार प्रकट होताना दिसते. कधी ती शिवाचा संहारकार्य करताना दिसते, तर कधी ब्रह्माचे निर्माणकार्य करताना दिसते, तर कधी विष्णूचे पालनकार्यही तीच करते.
महाशक्तीची करवीर माहात्म्यातील निवडक स्तोत्रे, मूळ संस्कृत संहिता आणि त्यांची मराठी आवृत्ती पूजेच्या निमित्ताने भक्तांच्या समोर पोहोचणार आहे. आजची ही पूजा माधव मुनीश्वर आणि मकरंद मुनीश्वर यांनी बांधली आहे.
हेही वाचा- 'शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची, कायदेशीर दोन्ही लढाई लढाव्या लागणार'