कोल्हापूर Old Pension Scheme : 'जुनी पेन्शन योजना लागू करा' या मागणीसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून (14 डिसेंबर) संप सुरु केलाय. या संपात सर्व राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यामुळं जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा एकादा ऐरणीवर आलाय. बुधवारी (13 डिसेंबर) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एक बैठक आयोजित केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. याबैठकीसाठी राजपत्रित अधिकारी संघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, विविध संघटनांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी संप पुढं ढकलण्यात यावा यासाठीच सरकारकडून प्रयत्न सुरू होते, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूरातील 65 हजार कर्मचारी सहभागी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह विविध मागण्यासाठी सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 65 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, रात्री बारा वाजल्यापासून या संपाला सुरुवात झाली आहे. सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभागी होत रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. तसंच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कर्मचारी एकत्र येत निदर्शने करणार आहेत.
17 लाख कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर - 3 दिवसांपुर्वी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संघाच्या वतीनं विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शासन सकारात्मक असून येत्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्यावतीने विधिमंडळात दिल्यानंतरही कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन-भत्ते सेवानियम याबाबतीत ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे आहेत. कामाचे स्वरूप समान आल्यामुळे केंद्रासमान वेतन-भत्ते सेवाशर्ती असाव्यात, असा आग्रह अनेक आंदोलनाच्या माध्यमातून यावेळी राज्य शासनाकडं धरण्यात आला. दोन दिवसांच्या आंदोलनात जुन्या पेन्शनसह 18 अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. या संपात राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर असणार आहेत.
रुग्णांचे हाल होऊ देणार नाही : दरम्यान, बुधवारी (13 डिसेंबर) नागपूर येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समन्वय समिती यांच्यामध्ये बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळं आजपासून सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याचे महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचारी समन्वय समितीचे अनिल लवेकर यांनी सांगितलं. तर या संपाचा परिणाम रुग्णसेवेवर होणार असून सीपीआर रुग्णालयातील रुग्णांचे हाल होणार आहेत. मात्र, एखादी इमर्जन्सी केस आली तर आम्ही हजेरी न लावता या संपामध्ये सहभागी होऊन रुग्णावर उपचार करणार आहोत. तसंच रुग्णांचे हाल होऊ देणार नाही, असं यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचा -