कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक चांगलीच रंगत आहे. महाविकास आघाडीत फूट पडली आहे. शिवसेनेने आरपीआय आणि शेकाप ला जवळ करत सर्व जागांवर पॅनल जाहीर करत थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना १९९६ च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी देत मुलगी मानले. नंतर दुसऱ्यांदा उमेदवारी दिली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बहिण मानले. एवढे करूनही त्यांनी शिवसेनेचा अपमान केला म्हणत निवेदिता माने यांच्यावर संजय पवार यांनी टीका केली. तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेने मंत्री केले परंतु आता तेच शिवसेनेला साथ देण्याच्याऐवजी सोडून गेले याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील पवार यांनी दिला आहे.
शिवसेनेसोबत मोठे राजकारण
बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत मोठे राजकारण झाले. आम्ही तीन जागा मागितल्या होत्या, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन देण्यास तयार झाले होते. परंतु तिसऱ्या जागेसाठी त्यांनी आम्हाला नकार दिला. राज्यात महविकास आघाडीची सत्ता असुनही शिवसेनेसोबत कोल्हापुरात दुजाभाव करण्यात आला. या उलट भाजपशी हातमिळवला गेला. शिवसेनेला एकटे पडण्याच्या नेत्यांचा पूर्वनियोजीत डाव होता असा आरोपही संजय पवार यांनी केला.
पदाधिकाऱ्यांची बैठक
शिवसेना स्वतंत्र पॅनल उभा करून लढत आहे. पॅनलला चिन्हही मिळाले आहे. उमेदवार आणि त्यांचा प्रचाराच्या तयारी साठी करवीर विधानसभा, उत्तर विधानसभा, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.यावेळी संजय पवार म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेचा अवमान केला आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकणार या उद्देशाने कामाला लागलो आहोत. जिल्ह्यात आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणजे स्वार्थी नेते विरुद्ध शिवसेनेचे स्वाभिमानी कार्यकर्ते अशी निवडणूक होणार आहे.
मानेंनी शिवसेनेचा अपमान केला
शिवसेनेने मानेंवर जिवापाड प्रेम करूनही त्यांनी शिवसेनेचा अपमान केला. जी भाजप शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पावलोपावली अपमान करते, अशांसोबत माने कुटुंबीय गेले याच दुःख जास्त वाटत आहे. शिवसैनिक हे कधी विसरणार नाही. शिवसैनिकांना शुल्लक समजू नका, असा इशारा पवार यांनी निवेदिता माने यांना दिला.
उमेदवार ठरवण्याचा अधिकार कोणी दिला?
शिवसेनेच्याविरोधात गेलेल्यांच्या विरोधात आता कामाला लागले पाहिजे असे पवार म्हणाले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेने मंत्री केले त्यांनी जिल्हा बँकेत शिवसेनेसोबत राहणे अपेक्षित होते. मात्र ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या सोबत गेले याचा त्यांना मोबदला मोजावा लागेल. शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. ज्या कोल्हापुरातून महाविकास आघाडीची सुरूवात झाली त्या कोल्हापुरातूनच शिवसेना म्हणजे काय ते दाखवून देऊ असा निर्धारच संजय पवार व शिवसैनिकांनी केला आहे.