कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बच्चू कडू यांच्यावर जोरदारी टीका केली. मणिपूरमध्ये हिंसा घडतेय. याच राज्याला लागून असलेल्या मिझोरामसह अन्य राजांच्या सीमा चीनशी जोडल्या गेल्या आहेत. चीनच्या जवळ असलेल्या या राज्यांमध्ये अशांतता असणं ही गंभीर बाब आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना विनंती केली होती. मात्र केंद्र सरकार सीमा सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोप शरद पवारांनी केला.
तरुणांची साथ : आमदार फुटले म्हणून पक्ष फुटला असं नाही. सत्तेचा गैरवापर करुन विरोधीपक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपाकडून केलं जातंय. याविरोधात आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. काही आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असे नव्हे? पक्षात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरूय. आतापर्यंत झालेल्या तीन सभांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. ही सकारात्मक विचारांची सुरुवात असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभरातील जनतेच्या भावना जाणून घेत आहेत. यासाठी त्यांनी येवला, बीड आणि कोल्हापूरमध्ये सभा घेतली.
पक्षाने अजून काय करावं : सत्तेचा गैरवापर करुन भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीतील फुटलेल्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लावला. यात मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. यावरुन हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली होती. मुश्रीफ यांच्या आरोपाला उत्तर देताना शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. पक्षाने अजून तुमच्यासाठी काय करायला हवं? तुरुंगात जाऊन आलेले नेते पक्षाबद्दल काय बोलत नाहीत. मात्र तुरुंगात न गेलेले नेते याबद्दल बोलतात, अशी टीका शरद पवारांनी मुश्रीफांचं नाव न घेता केली.
साखरेचे दर उतरतील : 15 सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचे केंद्राचे धोरण आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर कमी होतील, असा अंदाज माजी कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी व्यक्त केला. राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने तोंडाशी आलेली पिके करपत आहेत, मात्र राज्य सरकारचे याच्याकडे लक्ष नाही. आतापर्यंत पंचनामे सुरू करायला हवे होते, पण सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचं यातून दिसून येतंय.
कोण बच्चु कडू : प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील राजकारणावर बोलताना हा पवार काका पुतण्यांचा हा गेम असल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना शरद पवारांनी कोण बच्चू कडू, असा प्रतिप्रश्न केला? आमदार कडू हे चारवेळा लोकांमधून निवडून आले आहेत असं पत्रकारांनी सांगताच पवारांनी 'मी राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री राहिलोय',असा पलटवार केला.
'इंडिया' आघाडीची बैठक : 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दोन दिवशी 'इंडिया' आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधातील इतर राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. देशभरातील 16 प्रादेशिक पक्षांचे अध्यक्षही या बैठकीला हजर राहणार आहेत. सत्तेवर असलेल्या भाजपाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात 'इंडिया' आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असेही पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा-