कोल्हापूर - २०१९चा महापूर आणि कोरोनामुळे कोट्यावधीचा फटका बसलेला कुंभार समाज आज संभ्रमावस्थेत आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवासंदर्भात अद्याप नियमावली जाहीर केली नसल्याने यंदाही कोट्यवधीचा फटका सहन करावा लागणार आहे. मागील वर्षी गणेशोत्सवात ऐनवेळी मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातले. त्यामुळे गणेश मूर्ती पडून राहिल्या. त्याचा फटका कुंभार समाजाला बसला. लाखो रुपयांचे कर्ज काढत कुंभार समाज दरवर्षी गणेशोत्सवात भांडवली गुंतवणूक करत उदरनिर्वाह करत असतो. यंदाही राज्य सरकारने कोणतेच नियम अद्याप जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे कुंभार समाज आजही संभ्रम अवस्थेत आहे. राज्य सरकारने यंदा कोणतेही निर्बंध न घालता व्यवसायास परवानगी द्यावी, अन्यथा कुंभार समाज भिकेला लागण्याची वेळ येईल, असा टाहो कुंभार समाज फोडत आहे. कुंभार समाजातील या मुर्तीकारांची अवस्था काय आहे? याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा.
2019मध्ये कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे कुंभार समाजाला सर्वाधिक फटका बसला होता. अनेक कुंभार बांधवांच्या लहान मोठ्या श्रीच्या मूर्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे कोट्यवधींचा फटका या कुंभार समाजाला बसला होता. तर मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवावर राज्य सरकारने निर्बंध घातले. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना चार फुटापर्यंत तर घरगुती गणपतीला एक फुटापर्यंत मूर्ती परवानगी दिली. हा निर्णय ऐनवेळी घेतल्याने कुंभार समाजाला त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला. कोल्हापुरासह जिल्ह्यात लहान-मोठे जवळपास पाच हजारपेक्षा सार्वजनिक तरुण मंडळ आहेत. दरवर्षी तीन फुटापासून ते 21 फुटांपर्यंत या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, गेल्या वर्षी राज्य सरकारने ऐनवेळी मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातल्याने सार्वजनिक तरुण मंडळाने देखील त्याचा फटका बसला. या सर्वाचा परिणाम पाहायला गेल्यास कुंभार समाजाला याचा तोटा सहन करावा लागला.
ऐनवेळी निर्णय झाल्यास पुन्हा कोट्यवधींचा फटका -
मागील वर्षीपेक्षा यंदा कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. असा विचार करून कुंभार समाजातील या मूर्ती व्यावसायिकांनी पुन्हा मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. लाखो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी तीन फुटापासून ते अठरा फुटापर्यंत मूर्ती बनवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राज्य सरकारने वेळोवेळी पुन्हा तोच निर्णय घेतल्यास पुन्हा एकदा या व्यावसायिकांना कोट्यावधींचा फटका बसू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने नियमावली जाहीर करावी. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात कुंभार समाजावर कोणतेच निर्बंध घालू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - सरकार दरबारी खेटे घालून थकले एसटी कर्मचारी; पगारासाठी घातला महादेवाला अभिषेक
प्लॅस्टर बंदीचाही फटका -
गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने प्लास्टरला बंदी घातली आहे. त्यामुळे गणेश मूर्ती बनवत असताना प्लास्टरचा वापर करू नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे. मात्र, कोरोना आणि महापुरामुळे आधीच फटका सहन केला आहे. आता फटका सहन करण्याची ताकद कुंभार समाजामध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारने प्लास्टरच्या गणेशमूर्तींना परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी केली आहे.
अनेकांनी सोडला व्यवसाय -
गतसाली निर्बंध आल्याने कुंभार बांधवाना कोट्यवधींचा फटका सहन करावा लागला. लाखोंची कर्ज काढून हा व्यवसाय उभारला होता. त्याची परतफेड करायची कशी हा सवाल त्यांच्यासमोर होता. त्यामुळे हा व्यवसाय बंद करून मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली आहे.
राज्य सरकारने गुन्हे नोंद केले तरी चालेल...
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कुंभार समाजातील या व्यावसायिकांचेही अतोनात हाल झाले आहे. त्यामुळे यंदा राज्य सरकारने कुंभार समाजाचा विचार करावा. गणेशोत्सवात कोणतेही निर्बंध लावू नये. पोट भरण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, अन्यथा राज्य सरकारच्या उलट भूमिका घेऊन मूर्ती करण्यास सुरुवात करू, त्यावर राज्य सरकारने गुन्हे नोंद केले तरी चालतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - पुण्यात 'सॉरी मॉम' लिहून पोलीस शिपायाने हाताची नस कापून घेतला गळफास