कोल्हापूर Muralidhar Jadhav PC : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी (Sujit Minchekar) माध्यमांसमोर बोलताना राजू शेट्टी आणि ठाकरे भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर आज जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. (ShivSena Kolhapur)
कान भरल्याने हकालपट्टी : माजी आमदार सुजित मिणचेकर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे कान भरले. माझी जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यास मिणचेकर आणि अंधारे जबाबदार आहेत, असा हल्लाबोल मुरलीधर जाधव यांनी केला. माझ्यावर झालेला अन्याय सहन होत नाही, त्यामुळे मला डोक्यात गोळी घालून घ्यावीशी वाटते अशी उद्विग्न प्रतिक्रिया जाधव यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषद दरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले.
मिणचेकरांनी 67 एकरांचा भूखंड हडपला : शिवसेनेच्या तिकिटावर हातकणंगले मतदारसंघातून विधानसभेत गेलेले माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीमधील माजी खासदारांच्या नावावर असलेला 67 एकरांचा भूखंड हडपला आहे. यासाठी ते कोल्हापुरातील औद्योगिक विकास कार्यालयात टोळकं घेऊन फेऱ्या मारत असतात असा आरोप करत मुरलीधर जाधव यांनी केला. चार महिन्यांपासून मिणचेकर मला कार्यमुक्त करा, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे करत असल्याचा गौप्यस्फोट यावेळी जाधव यांनी केला.
उपऱ्या उमेदवाराला लोकसभेचं तिकीट, याला विरोध : माझ्या जिल्हा प्रमुख कार्यकालापासून 2009, 2014, 2019 या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले मतदारसंघातून उपऱ्या उमेदवाराला शिवसेनेने पाठबळ दिले. लोकसभेत गेलेल्या या खासदारांनी मतदारसंघात शिवसेनेला संपवण्याचे काम केले. यापैकी उल्हास पाटील, सत्यजित पाटील (सरूडकर), किंवा स्वतः सुजित मिणचेकर यांना शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिली असती तर त्यांचं काम प्राणपणानं केलं असतं. मात्र, उपऱ्या उमेदवाराला हातकणंगले मधून उमेदवारी देऊन शिवसेनेचं कोणतं भलं झालं? असा सवाल ही यावेळी जाधव यांनी उपस्थित केला.
हेही वाचा: