कोल्हापूर - घरगुती वीज मीटर मंजूर करण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. सुनील बाबासाहेब चव्हाण (वय 54, रा. महावीर पार्क, सांगली), असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांच्या एका ग्राहकाचे घरगुती वीज मीटर मंजूर करायचे होते. त्यासाठी त्यांनी इचलकरंजी येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुनील बाबासाहेब चव्हाण यांची भेट घेतली आणि मंजुरीबाबत विनंती केली. मात्र, संबंधित सहाय्यक अभियंता सुनील चव्हाण यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. तक्रारदाराने तात्काळ याबाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती दिली.
लाचलुचपत विभागाने सुद्धा याबाबत पडताळणी केली असता चव्हाण यांनी लाचेची मागणीकेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा रचत चव्हाण याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.