कोल्हापूर - केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल 1 कोटी 48 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून अत्याधुनिक पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (ध्वनिक्षेपण यंत्रणा) बसविण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या नवीन ध्वनिक्षेपण यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रात कुठेही अशी अद्ययावत ध्वनिक्षेपण यंत्रणा पाहायला मिळणार नाही
विविध धार्मिक कार्यक्रमांसह धार्मिक गीते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळोवेळी मंदिर परिसरात सूचना देता याव्या, यासाठी या अद्ययावत ध्वनिक्षेपण यंत्रणेचा उपयोग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची ध्वनिक्षेपण यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात पाहायला मिळणार नाही, असे संभाजीराजेंनी सांगितले. या संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी राहुल जगताप यांच्याकडे आहे.
नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या फोटोंची दिनदर्शिका बनवण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशनही खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. दिनदर्शिकेवर अंबाबाई आणि ज्योतिबाच्या विविध रुपातील पूजेचे आकर्षक आणि डोळ्यात साठवून ठेवावे, असे छायाचित्र छापण्यात आले आहेत.
लवकरच मंदिर परिसरात 'एलईडी स्क्रीन'
केंद्र शासनाच्या संस्कृती विभागामार्फत मिळालेल्या निधीतून मंदिर व वीस मीटर बाह्य परिसरात चार मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. याचा लाईव्ह दर्शन, नित्य नैमित्तिक विधींचे प्रक्षेपण, किरणोत्सव आदींसाठी उपयोग करता येणार आहे. याचबरोबर संदेश सुविधाही (मेसेज डिस्प्ले सिस्टीम) लवकरच कार्यान्वित होणार आहे.
हेही वाचा - जिल्ह्यातल्या 9 खासगी सावकारांच्या घरावर सहकार विभागाचे छापे; अनेक दस्तऐवज जप्त
हेही वाचा - कोल्हापूरला गरज 120 एमएलडी पाण्याची मात्र, गळतीमुळे होतोय अतिरिक्त उपसा