कोल्हापूर - 'आमच्या सत्तारुढ आघाडीकडेसुद्धा 2200 पेक्षा अधिक ठरावधारक आहेत. आमचे पॅनेल मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. त्यामुळे आमच्या विजयाला काहीही अडचण नाही. काही संचालक तिकडे गेले असले तरीही काहीच फरक पडणार नाही. यापूर्वीसुद्धा काही संचालक फुटून विरोधात गेले होते. मात्र तरीही आमचे पॅनेल निवडून आले होते', असे आमदार पी. एन. पाटील यांनी म्हटले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमच्या विरोधी आघाडीला 2280 मतदारांचा पाठिंबा आहे, असे म्हटले होते. त्यावर पी. एन. पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, न्यू मॉडेल स्कूल येथील मतदान केंद्रावर पी.एन. पाटील आपल्या मतदारांसोबत दाखल झाले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
'आम्ही केवळ मतदानासाठी शेतकऱ्यांजवळ जात नाही'
पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ संघ व्यापाऱ्यांच्या हातातून शेतकऱ्यांच्या हातात जाईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे सकाळी म्हटले होते. त्याला उत्तर देताना आमदार पी. एन. पाटील म्हणाले, की 'शेतकऱ्यांच्या हातातच हा संघ आहे. व्यापाऱ्यांच्या हातात संघ नाही. मतदारसुद्धा शेतकरीच आहेत. गेल्या 30 वर्षात शेतकऱ्यांच्याच हातात हा संघ आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्याकडे जात आहोत. केवळ मतदानासाठी जात नाही. महाराष्ट्रासह देशात 82 टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांना परतावा देत असतो. त्यामुळे त्यांनाही ही गोष्ट चांगली माहिती आहे. 4 मे रोजीच हे पॅनेल किती मतांनी निवडून येईल हे समजेल'.
आज (2 मे) सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत गोकुळच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 70 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर जवळपास 50 ते 55 मतदार मतदान करू शकतील, असे नियोजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांची मतदान केंद्राबाहेर तपासणी करण्यात आली. या मतदान प्रक्रियेसाठी तब्बल 385 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतमोजणी मंगळवारी 4 मे रोजी होणार आहे.
हेही वाचा - 'आम्हाला 2 हजार 280 मतदारांची साथ; गोकुळ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हातात जाईल'
हेही वाचा - पंढरपूर-मंगळवेढामध्ये भाजपचे 'समाधान', 3 हजार 733 मतांनी आवताडे विजयी