कोल्हापूर - केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महायुतीचे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये कसलाच फरक जाणवत नाही. परिणामी महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी या निवडणुकीत आमचा उमेदवार उभा केला आहे, असे प्रतिपादन आमदार कपिल पाटील यांनी केले.
पुणे शिक्षक मतदारसंघाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी व शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार गोरक्षनाथ किसन थोरात यांच्या प्रचारार्थ आमदार कपिल पाटील आज कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.
महाविकास आघाडी सरकारकडून खूप अपेक्षा होती..
आमदार कपिल पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारकडून खूप अपेक्षा होती. त्यांनी शिक्षकांच्या विरोधात भूमिका बजावली आहे. विनाअनुदानित आणि कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. तो शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने शिक्षक भारती व महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचा उमेदवार उभा केला आहे. त्या उद्देशानुसार तो काम करेल. कोणत्याही पैशाच्या पाकिटाला, प्रलोभनाला, जेवणावळीला बळी पडणार नाही, असा विश्वास आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन रखडले आहे. भविष्य निर्वाह प्रकरण रखडले आहेत. आमच्या उमेदवाराचा विजय झाल्यास १०० दिवसांत ही प्रकरणे निकाली काढू, असा विश्वास आमदार पाटील यांनी दिला.