कोल्हापुर - इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला छत्रपती श्री शिवाजी महाराज नामकरण करावे, या मागणीसाठी माजी मंत्री व आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व हिंदूत्ववादी कार्यकर्ताच्या समवेत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये काही काळ ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत नामकरण करावे या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे म्हणत तीव्र घोषणाबाजी करण्यात आल्या.
काय आहे नेमके प्रकरण -
शहरातीलमध्यवर्ती बस स्थानकावर छत्रपती श्री शिवाजी महाराजमध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी या नावाचा बोर्ड लावण्यात आला होता. तो बोर्ड एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी काढला होता. त्यामुळे, आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांच्यासोबत आज शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीवर छत्रपती श्री शिवाजी महाराजमध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी अशा नावाचा बोर्ड परत लावा, या मागणीसाठी मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आले. बसस्थानक प्रमुखासह सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या पूर्वी लावलेला छत्रपती श्री शिवाजी महाराजमध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी या नावाचा फलक पूर्वत लावावा. अन्यथा ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा देवून, बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले.
सतेज पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित -
या आंदोलनाची माहिती राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना समजली. त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याबरोबर फोनवरुन संपर्क साधून चर्चा केली. चर्चेदरम्यान मंत्री सतेज पाटील यांनी याविषयी 2 मार्चला मुंबईमध्ये राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात येईल. या बैठक इचलकरंजीमधील मध्यवर्ती बस स्थानकाला छत्रपती श्री शिवाजी महाराजमध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी असे नाव देण्याबाबत धोरणात्मक ठरविण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आमदार आवाडेनी आपले आंदोलन काही काळासाठी स्थगित केले.
बस स्थानक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप -
या आंदोलनाची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार मोठया पोलीस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यामुळे बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या परिसराला पोलीस छावनीचे स्वरूप आले होते. यावेळी नगरसेवक सुनिल पाटील, नगरसेवक राजू बोंद्रे, नगरपालिका पाणी पुरवठा समितीचे सभापती दिपक सुर्वे, प्रकाश दत्तवाडे, भारत बोगार्डे, संजय जाधव, प्रा. शेखर शहा, मोहन मालवणकर, पुंडलिक जाधव आदीनी सहभाग घेतला होता.