कोल्हापूर - महाविकास आघाडीच्या सरकारला परीक्षाच घ्यायच्या नाहीत हा गैरसमज आहे. मुळात राज्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. 8 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी 3 लाख लोकांची यंत्रणा कामाला लागते. एकीकडे आयआयटीने परीक्षा रद्द केली, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने देखील परीक्षा रद्द केली. आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करतोय, त्यामुळे परीक्षा रद्दच्या निर्णयावर ठाम असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. तसेच डिझास्टर मॅनेजमेंटनेसुद्धा महाराष्ट्रात परीक्षा होणार नाहीत असे सांगितले आहे. ते आम्ही युजीसीला कळवणार असल्याचे उदय सामंत म्हणाले. शिवाय युजीसीनेसुद्धा महाराष्ट्राचा आढावा घेऊन परिस्थिती समजून घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल किंवा मराठी भाषेतील महाविद्यालय स्थापन करण्याबाबत स्थापन केलेल्या समितीसोबत मंत्री सामंत यांची आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ येथे बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संकुल उभे करण्याच्या अनुषंगाने काम करण्याचा निर्णय झाला आहे. विद्यापीठांशी संलग्न असलेले कॉलेज सीमा भागात सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात शिवाजी विद्यापीठसुद्धा लढा देत आहे. विद्यापीठातील 6 हॉस्टेलमध्ये कोविड सेंटर आहेत. शिवाय विद्यापीठाने संशोधन करून स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'व्हायरस कवच' नावाचे केमिकल विद्यापीठाने बनवले असून, ज्याप्रकारे बॉडी स्प्रे अंगावर मारतो त्याच पद्धतीने तो कपड्यांवर मारला तर कपड्यांवरचा कोरोना व्हायरस नष्ट होतो असा विद्यापीठाने दावा केला आहे. त्यांच्या या संशोधनाचे कौतुक करण्यासारखी बाब असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत बोलताना सामंत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला परीक्षा घायच्या नाहीत असे नाही. परिस्थितीचे गांभीर्य पाहून आणि त्यावर विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. पण आम्ही पहिल्या काढलेल्या जीआरनुसार जर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायच्याच असतील तर कोरोनाचे संकट दूर झाल्यावर ते देऊ शकतात. त्यांची परीक्षा घ्यायला आम्ही तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, विरोधक ज्या पद्धतीने सांगत आहेत की, हे सर्व विद्यार्थी कोव्हिड 19 चे पदवीधारक म्हणून बाहेर पडतील असे सांगत आहेत. याने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होत असल्याचे सामंत म्हणाले.
माजी शिक्षणमंत्री विनोद सावंत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले की, त्यांनी कोणावरही टीका करावी. आम्ही 60 जीआर काढून मागे घेत नाही. आम्ही एकच जीआर काढला आहे आणि त्याच्याच मागे आहोत. शिवाय खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी पोलिसांसोबत केलेल्या वादावादीच्या व्हिडिओबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, ज्यांनी तो व्हिडिओ ट्विट केला आहे तो व्हिडिओ एडिट केलेला आहे. त्या ट्विटमध्ये मद्यपान केल्याचे म्हटले आहे. मात्र, खासदारांचा मुलगा निर्व्यसनी आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाने स्वतःहून काही केले नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.