कोल्हापूर - राज्यपालांना आम्ही स्वतः 12 सदस्यांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी याबाबत विविध भाष्य केली आहेत. शिवाय प्रस्ताव लवकर मान्य करावा याबाबत आम्ही त्यांना अतिशय नम्रपणे वारंवार आठवण करून देत आहोत. त्यावर राज्यपालांनीही खासगीत काही मत व्यक्त केले आहेत. ती जाहीरपणे सांगणे योग्य होणार नाही. पण, आम्ही प्रस्ताव दिला असतानाही आता प्रस्तावच मिळाला नाही म्हणणे हे आश्चर्यकारक असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अनेक सरकार आली अन् गेली पण अशी वागणूक कोणी दिली नाही
यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, राज्यपाल हे राज्याचे मुख्य व्यक्ती आहेत. त्यामुळे ते प्रस्ताव मुद्दाम मान्य करत नाहीत हे बोलणे योग्य होणार नाही. मात्र, आता बराच काळ गेलेला आहे. विधान परिषदेतील 12 सदस्यांच्या जागा मोकळ्या आहेत. याचे शल्य सगळ्या महाराष्ट्रातील जनेतेला आहे. याआधी अनेक सरकार आली आणि गेली पण, कुठल्याही सरकारला, अशी वागणूक दिली गेली नव्हती. ती सध्या दिली जात असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. पण, लवकरच राज्यपाल 12 सदस्यांचा तो प्रस्ताव मान्य करतील अशी सर्वजण अशा करु, असेही ते म्हणाले.
दरेकरांचे ट्विट वाचत जाऊ नका
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली होती. यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून त्यांचे ट्विट वाचत जाऊ नका, असे म्हंटले आहे. शिवाय महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. मुंबई आणि पुण्यामध्येही कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. याबाबत स्वतः पंतप्रधानांनीही कौतुक केले आहे. त्यामुळे दरेकर यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दरेकरांना लगावला आहे.
हेही वाचा - उचंगी प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न 15 जूनच्या आत मार्गी लावा - जयंत पाटील