कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह दर 16 टक्क्यांवर असल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने व परवानगी दिलेली दुकाने सुरू राहणार आहेत. तर हॉटेलमधील पार्सल व्यवस्था सुरू राहणार असून शनिवार-रविवार हॉटेल पूर्णपणे बंद असणार आहेत. दरम्यान व्यापारी वर्गाने शासनाच्या या निर्णयाला विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत दुकाने आजपासून (सोमवार) सुरू करण्याचा निर्धार केला आहे. परिणामी व्यापारी आणि प्रशासन यांचा संघर्ष कोल्हापुरात पाहायला मिळत आहे.
विकेंड लॉकडाऊन कायम
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्याची पाच वर्गात विभागणी केली. त्यामध्ये कोल्हापूर चौथ्या विभागात आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊबाबतचे निर्बंध पुन्हा कायम केले आहेत. या नियमानुसार कोल्हापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. अन्य सर्व प्रकारची दुकाने आस्थापना बंद राहतील. हॉटेल्स, बार, परमिट रूम आदी व्यवसाय बंद राहतील केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन कायम राहणार ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
व्यापारी संघटनेचा आंदोलन करण्याचा इशारामात्र, गेल्या तीन महिन्यांपासून आमची दुकाने बंद आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आजपासून (सोमवार) सर्व अस्थापना उघडणार, असा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे. दरम्यान आज (सोमवार) सकाळी कोल्हापुरातील महाद्वार परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी महापालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे यांनी कोणती कारवाई करायची ते करा, आम्ही आता शांत बसणार नाही. सकाळी अकरानंतर दुकाने सुरू ठेवणार. जिल्हा प्रशासनाने वारंवार पॉझिटिव्हिटी रेट खोटे सांगून राज्य सरकारची व व्यापाऱ्यांची फसवणूक करत आहे. प्रशासनाच्या गोंधळामुळे व्यापाऱ्यांची ही अवस्था बनली आहे. केवळ व्यापाऱ्यांच्यामुळेच कोरोना वाढतो असे नाही. त्यामुळे आम्हाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. कारवाई केली तर कुटुंबासमवेत आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.
बैठकीत निर्णय
दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख आणि व्यापारी संघटनेची बैठक सोमवारी सकाळी 11 वाजता घेतली जाणार आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर काही तोडगा निघतो का याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.