कोल्हापूर - सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही जागा काँग्रेसकडे रहावी यासाठी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवडे आणि आमदार विश्वजित कदम यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली.
सांगलीऐवजी दुसरा पर्याय निवडण्याची विनंती प्रकाश आवडे यांनी शेट्टी यांना केली आहे. सांगली लोकसभा जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसमध्ये महत्वाची बैठक आज पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवडे ,काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यात सुमारे तासभर बैठक झाली.
या बैठकीत प्रामुख्याने सांगलीच्या जागेबाबत दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी आवडे यांनी सांगलीच्या जागेऐवजी दुसरा पर्याय निवडण्याची विनंती शेट्टी यांना केली आहे. यावेळी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आवडे यांनी दिली आहे. यासंदर्भात उद्या निर्णय होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.