कोल्हापूर : Manipur Black Rice : मणिपूर राज्यातील प्रसिद्ध ब्लॅक राईस पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्यानं उत्पादित होतो. या तांदळाच्या वाणांवर शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागानं संशोधन केलंय. यामध्ये गॅमा रेडिएशन आणि ई. एम. एस. केमिकलच्या सहाय्यानं हे संशोधन करण्यात आलंय. यात वाणांचा उत्पादन कालावधी कमी झाल्याचं लक्षात आलंय. तसंच, उत्पादन क्षमतेतही वाढ झाल्याचं निरीक्षण शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधकांनी नोंदवलंय. (2016) पासून आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या वाणांवर यशस्वी संशोधन केल्यानंतर मणिपूर ब्लॅक राईस आणि काळ्या भाताच्या देशी वाणांवर पुढील टप्प्यातील चाचण्यानंतर हे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील परीक्षण : ब्लॅक राईस आणि काळवाणच्या मूळ गुणधर्मातील वनस्पतीची वाढ ही पाच फुटांपर्यंत होते. त्याचा उत्पादन कार्यकाल 145 दिवस असतो. तर, प्रतिरोध उत्पादन क्षमता 35.13 ग्रॅम प्रतिरोध अशी होती. तसेच, संशोधनाअंती याच वाणाची उंची 3 तर 4 फुट, कालावधी 120 दिवस तर उत्पादन 135 ग्रॅम प्रतिरोप वाढल्याचं सिद्ध झालंय. राधानगरीतील भात संशोधन केंद्रात पहिल्या टप्प्यातील परीक्षण करण्यात आलं. पुढील चाचण्यांसाठी कर्जत येथील केंद्रात हे वाण पाठवण्यात आलेत. यानंतर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक डॉ. रणजीत कुंभार, रणजीत लोंढे यांनी या शास्त्रीय चाचण्या घेतल्या. भविष्यात शेतकऱ्यांसाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एन. बी गायकवाड यांनी सांगितलं.
जादा उंचीनं होणारं नुकसान टळणार : मणिपूर ब्लॅक राईस आणि काळा भात या भाताच्या वाणांची उंची पाच फुटांपर्यंत वाढते. परिणामी उत्पादित होणारं भाताचे लोंबे वारा आणि वजनामुळे जमिनीवर पडतात. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते, यावर या संशोधनातून उपाय शोधला गेला. शिवाजी विद्यापीठात झालेल्या या संशोधनामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळणार आहे. शिवाय या वाणांच्या उत्पादनातही वाढ होणार असल्यानं भविष्यात हे संशोधन कृषी क्षेत्राला उभारी देणारं ठरणार आहे, असंही संशोधकांचं मत आहे.
हेही वाचा :
1 'मराठी पत्रकार दिन' 2024; कोण होते 'दर्पण'कार ?
2 अभिनेता मुश्ताक खानच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान उत्सवाचं उद्घाटन
3 शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ, भव्य रथयात्रेनं रसिकांचं वेधलं लक्ष