कोल्हापूर - तौक्ते चक्रीवादळामुळे विद्युत यंत्रणेचे नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज असून ग्राहकांनी सतर्क राहावे, विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये, आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.
आरोग्य यंत्रणेने त्यांची पर्यायी व्यवस्था ठेवावी -
या वादळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांनाही वादळानंतरची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. हवेचा वेग बघून अतिउच्च दाब व इतर वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. कोविड काळात सर्व आरोग्य यंत्रणा व हॉस्पिटलच्या प्रशासनानेही त्यांची पर्यायी व्यवस्था ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संयम राखावा, अशी विनंतीही महावितरणने नागरिकांना केली आहे. वीज ग्राहक व नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी २४ तास सेवेत असलेले टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.