कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कोल्हापूर यांचं एक वेगळं नातं आहे. पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे खुर्द हे पवारांचे आजोळ असल्याने त्यांचे बालपणापासूनच कोल्हापूरशी घट्ट ऋणानुबंध आहेत. कोल्हापुरातील जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर हे गेल्या 35 वर्षांपासून शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. शरद पवार जेव्हा-जेव्हा कोल्हापुरात येतात तेव्हा ते शिंदे-कल्याणकर कुठे आहेत अशी विचारणा हमखास करतात. आता मात्र राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याने शिंदे- कल्याणकर जोडीला अश्रू अनावर झाले आहेत.
'आम्ही शरद पवारांसोबतच कायम राहू' : रविवारी अजित पवारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत सुमारे 30 आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सैरभर झाला. मात्र कोल्हापुरातील जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर या कार्यकर्त्याच्या जोडगोळीने, अशी कितीही संकटे आली तरीही आम्ही शरद पवारांसोबतच पक्ष कार्यासाठी कायम राहणार असल्याचे सांगितले.
40 वर्षापासून शरद पवारांशी एकनिष्ठ : साल 1978 होते. कोल्हापुरातील गजबजलेल्या भवानी मंडप रस्त्यावर एक लांबलचक काळ्या रंगाची कार येऊन थांबली. कारमधून साडेसहा फुटांचा धिप्पाड देह- दंड असलेला उमदा तरुण उतरला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर यांना त्याने हाक मारली आणि मोतीबाग तालमीचा पत्ता विचारला. हा तरुण म्हणजे शरद पवार आहेत असं लक्षात आल्यानंतर शिंदे-कल्याणकर यांनी त्यांच्याच गाडीतून मोतीबाग तालमीपर्यंतचा पहिला प्रवास शरद पवार यांच्यासोबत केला. तेव्हापासून आजतागायत शिंदे- कल्याणकर ही जोडगोळी पवारांशी एकनिष्ठ आहे. त्याच वर्षी राज्यात पुलोदचा प्रयोग झाला आणि शरद पवार मुख्यमंत्री बनले अशी आठवण जयकुमार शिंदे यांनी सांगितली.
भर सभेत ओळखले : चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या शरद पवारांची सभा दसरा चौकातील मैदानावर आयोजित करण्यात आली होती. राज्यातील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारा नेता अशी शरद पवार यांची ओळख आहे. त्याचा प्रत्यय या सभेच्या वेळी आला. व्यासपीठाच्या बाजूलाच किसन कल्याणकर आणि जयकुमार शिंदे उभे असल्याचे पवारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना करत या दोघांना बसायला खुर्ची देण्याचे सांगितले होते.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis : शरद पवार समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयातून अजित पवारांचे फोटो काढले
- Election Card On Sell : 'मतदान कार्ड विकणे आहे'..अकोल्यातील या युवकाने चक्क मतदान कार्ड विक्रीला काढलं!, पहा व्हिडिओ
- Dhananjay Munde Supporters Celebration : मंत्रीपद मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांचा जल्लोष, प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आनंद साजरा